केसरीवाडा गणपतीचा इतिहास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सर्व जनतेने एकत्र यावे यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. मात्र त्यांनी सुरु केलेल्या या उत्सवाने एक मोठे रुप धारण केले असून आता संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्यातही पुण्यातील गणेशोत्सवाची बात न्यारीच. आज आपण याच गणेशोत्सवाची सुरुवात करणाऱ्या केसरीवाडा गणपतीचा इतिहास पाहणार आहोत.

गणपतीचा इतिहास
पुण्यातील गणेशोत्सवातील मानाच्या गणपतींपैकी केसरीवाड्यातील गणपती हा मानाचा पाचवा गणपती आहे. या गणपतीच्या मूर्तीची पहिल्यांदा स्थापना हि लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये केली होती. त्यानंतर १९०५ पासून केसरीवाड्यात हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्याकाळापासून चालत आलेली गणपतीची मिरवणूक आजही पालखीतून काढण्याची परंपरा सुरु असून इतक्या वर्षानंतर देखील त्यामध्ये कोणताही खंड पडलेला नाही. त्यावेळी या गणेशोत्सव काळात विविध धार्मिक उत्सव तसेच जागृतीपर कार्यक्रम घेतले जात असत. त्याचबरोबर विविध व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जात असे. मागील १२६ वर्षांपासून विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने हा केसरीवाड्यातील गणेशोत्सव साजरा होतो.

सध्या या गणपतीच्या चांदीच्या मूर्तीची स्थापना केलेली असून मागील १० वर्षांपूर्वी तिची स्थापना करण्यात आली होती. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सनी ही मूर्ती घडवली आहे. तर गणपती काळात वेगळी मूर्ती बनवली जात असून पुण्यातील गोखले हि गणपतीची मूर्ती घडवतात. ढोल आणि ताशाच्या गजरात या गणपतीचे स्वागत केले जाते. त्याचबरोबर आजही पालखीतून मिरवणूक काढण्याची परंपरा कायम आहे.

मंडळाबाबत माहिती
केसरीवाडा गणपतीचे ट्रस्ट असून या ट्रस्टमार्फत पहिल्या दिवशी गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात येते. त्याचबरोबर या मंडळाचा सर्वाधिक भर हा देखाव्यावर नसून धार्मिक कार्यांवर असतो. पहिल्या दिवशी ‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक आणि सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या कालखंडात पहिल्या दिवसापासून विविध भजनी मंडळ आपली कला या गणपतीसमोर सादर करत असतात. त्याचबरोबर महिलांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले असते. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असून सामाजिक संस्थांना ते मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. त्याचबरोबर या गणेशोत्सव कालखंडात लहान मुलांसाठी देखील ते विविध स्पर्धांचे आयोजन करून बच्चे कंपनीचा आनंद ते द्विगुणित करत असतात.

आरोग्यविषयक वृत्त –