‘हिस्ट्रीशीटर’ गुन्हेगाराने पोलिस ठाण्यात साजरा केला पोलिसाचा ‘बर्थडे’

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील एका वसाहतीत असलेले ठाणे चांगलेच चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी हिस्ट्री सीटर असलेल्या एकाने ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत जावून एका पोलिसाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. विशेष म्हणजे या सोहळ्याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती लागू नये म्हणून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जिल्ह्यातील वसाहतीत असलेले हे ठाणे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी अधिकारी, कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता हिस्ट्री सीटरने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील साजरा केलेला वाढदिवस चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे गुन्हे प्रकटीकरण शाखेत हिस्ट्री सीटर असणार्याची नावे आणि छायाचित्रे असलेला एक फलक आहे. या फलका समोरच त्या शाखेतील एकाचा दणक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. या सर्व घडामोडींचे फोटोही काढण्यात आले आहेत. आणि सोशल मीडियावर ते व्हायरल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका स्थानिक माध्यमात याची बातमीही प्रसिद्ध झाली होती. याची माहिती मिळताच सम्बधित लोकांनी त्या माध्यमाचे सर्वच अंक विकत घेतले. शिवाय स्थानिक प्रतिनिधींना मॅनेज केले. त्यामुळे या प्रकरणाचा कोठेही बोलबाला झाला नाही. दरम्यान हे प्रकरण चव्हाट्यावर येवू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

भांडूप येथे पोलिसांनी गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला होता. याप्रकरणी सम्बधित लोकांना निलंबित करण्यात आले आहे. हा प्रकार ताजा असतानाच सांगली जिल्ह्यात हिस्ट्री सीटरने पोलिसाचा ठाण्यातच साजरा केलेला वाढदिवस चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान त्या पोलिसावर कारवाई होणार का असाही प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान सम्बधित पोलिस कर्मचारी पूर्वी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आरटीपीसी होता अशीही चर्चा आहे.

आरोग्यविषयक वृत्त