भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या रागातून मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – सांगवी, फेमस चौक येथे भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या रागातून एकाला मारहाण केली.
राजेंद्र ऊर्फ राजू पवार असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम राजेंद्र पवार (२३, रा. समतानगर, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली. तर महेश खमसे, ओंकार उर्फ बाबू शिंदे, सुमित कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू पवार हे गुरुवारी दुपारी समीर चिकन सेंटर येथे चिकन आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुकानमालक इब्राहिम अली आणि आरोपी यांच्यात भांडण सुरु होते. पवार हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना मारहाण केली.

तसेच दुकानातील वजनकाटा आणि फरशी डोक्यात मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी त्यांच्या मुलाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.