एचआव्ही रुग्ण संख्या घटली, मृत्यूचे प्रमाण वाढले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात एचआयव्हीग्रस्त रुग्णांची संख्या कमी होत असली तरी एचआयव्हीग्रस्तांच्या मृत्यूंचा आकडा वाढला आहे. दोन वर्षांत एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (एचएमआयएस) च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ६ वर्षात मुंबईतील एचआयव्हीग्रस्तांचे प्रमाण ६.४ टक्क्यांवरून १.९ टक्क्यांपर्यंत खाली आहे. एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात एचआयव्ही रुग्णांमध्ये घट होत आहे. मात्र, एकीकडे एचआयव्ही रुग्णांची संख्या घटत असताना एचआयव्हीग्रस्तांच्या मृत्यू संख्येत वाढ होत आहे. राज्यात एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. राज्यात ३ वर्षांत एचआयव्हीग्रस्त ४,२६० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात मुंबईतील ३२८ रूग्णांचा समावेश आहे. २०१८-१९ या वर्षभरात पुण्यात २७० तर सांगलीत १०३ रूग्णांचा एचआयव्हीने मृत्यू झाला आहे.

मागील कित्येक वर्षात एचआयव्हीसंदर्भात सुरू असलेल्या जागरूकतेमुळे रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या आजारपणात काही रुग्णांचा मृत्यू होतो, यामागे वेगवेगळी कारणे आहेत. अनेकदा रुग्ण औषधोपचार अर्धवट सोडतात, तर काही रुग्णांवर औषधांचा फरक पडत नाही. यासाठी आता रुग्णांची वायरल लोड चाचणी केली जाते. एखादे औषध काम करत नसल्यास त्याला औषध बदलून दिले जाते. रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळेवर चाचणी आणि औषधोपचारामुळे मृत्यूचा आकडा कमी करता येऊ शकतो.