HIV पॉझिटिव्ह व्यक्तीनं शरीरसंबंध ठेवणं हत्येचा प्रयत्न ठरत नाही : उच्च न्यायालय

पोलीसनामा ऑनलाइन – एड्सबाधित व्यक्तीने आपल्या जोडीदाराच्या सहमतीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीला हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणात दोषी ठरवता येणार नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात स्वत:च्या सावत्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एड्सचा रुग्ण असणाऱ्या आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची न्यायमूर्ती विभू बाखरू यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात आरोपीला हत्येच्या गुन्ह्यामधून निर्दोष मुक्त केले. मात्र, बलात्काराच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवले आहे. बलात्काराच्या आरोपात कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

लैंगिक अत्याचार किंवा बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये आरोपी एड्सचा रुग्ण असल्यास निर्णय देताना या गोष्टीचा विचार करणे महत्त्वाचे असते. मात्र, त्यासाठी त्याला भारतीय दंडसंहितेच्या कलम 307 नुसार दोषी ठरवता येणार नाही, असे मत व्यक्त केले आहे.

या व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यामागे काही तर्क असल्याचे दिसत नाही. तसेच यासाठी त्याला दोषी ठरवण्यात येणार नाही. एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीने असुरक्षितपणे शरीरसंबंध ठेवणे हे बेजबाबदारीच वागणे आहे असे म्हणता येईल.

ज्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयासमोर झाली, त्यामध्येही आरोपीमुळे पीडितेला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही. तसे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनीही हत्येचा कलम लावला नव्हता. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणामध्ये हत्येच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यांशिवाय कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणामध्ये आरोपीने शरीरसंबंध ठेवल्याने पीडितेला संसर्ग झाल्याचे मानले आणि त्यामुळे तिच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे गृहीत धरले, असेही न्यायालयाने म्हटले आहे.