शिवसेना एकाच मंत्रिपद मिळाल्याने नाराज ? संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर आज नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विक्रमी ३५३ जागा जिंकणे विरोधी पक्षांना धूळ चारली. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपमध्ये या शपथविधी सोहळ्यासाठी उत्साह दिसून येत आहे. या बरोबरच मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी देखील होणार असल्याचेच समजते. २०१४ च्या तुलनेत यावेळी मोदींच्या टीममध्ये तरुण मंत्र्यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजप आपल्या सगळ्या मित्रपक्षांना यावेळी एक मंत्रिपद देत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मोठा मित्रपक्ष असलेला शिवसेना नाराज झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा मिळाल्याने यंदा सत्तेत मोठा वाटा मिळावा, अशी शिवसेनेची अपेक्षा होती. त्यासाठी शिवसेनेकडून भाजपसमोर तीन मंत्रिपदे, राज्यपाल पद आणि उपसभापती अशा पाच पदांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र भाजपने त्यांना यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. शिवसेनेला अरविंद सावंतांच्या रूपाने फक्त एक मंत्रिपद देण्यात आले आहे.

यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी म्हटले कि, या सर्व गोष्टी निराधार आहेत. राजकारण भावनेवर चालत नाही. तर ते संख्याबळावर चालते. त्यांचे खासदार जास्त असल्याने त्यांचे मंत्री जास्त होणार हे साहाजिक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला उर्जा, अवजड उद्योग आणि नागरी उड्डाण या तीनपैकी एखादे खाते मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना रेल्वे खात्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता अरविंद सावंत कोणत्या मंत्रिपदाची शपथ घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

https://zeenews.india.com/marathi/india/s/475406