भारतीय हॉकीतील दिग्गज बलबीर सिंह यांचे निधन, देशाला ऑलिंपिकमध्ये दिली होती 3 गोल्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय हॉकी टीमला तीन गोल्ड मेडल जिंकून देणारे हॉकीचे दिग्गज बलबीर सिंह सीनियर यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते दिर्घकाळापासून आजारी होते आणि मोहालीच्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या कौटुंबिक सूत्रांनी सांगितले की, त्यांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते, ज्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर परिणाम झाला होता.

8 मे राजी केले होते हॉस्पिटलमध्ये दाखल
बलबीर सिंह सीनियर यांना 8 मे रोजी भरती करण्यात आले होते. ते 18 मेपासून अर्धवट बेशुद्ध होते आणि त्यांच्या मेंदूत रक्ताची गुठळी झाली होती. निमोनिया आणि जास्त ताप असल्याने नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मोहालीच्या फोर्टीस हॉस्पिटलचे डायरेक्टर अभिजीत सिंह यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. 95 वर्षांचे बलबीर सिंह सीनियर यांना मागच्या वर्षीसुद्धा श्वासाचा त्रास होत होता. त्यावेळी त्यांना अनेक आठवडे चंडीगढच्या पीजीआयएमयआरमध्ये ठेवण्यात आले होते.

बलबीर सिंह सीनियर यांनी लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये नेदरलँडविरूद्ध 6-1 ने मिळवलेल्या विजयात त्यांनी पाच गोल केले होते आणि हा विक्रम अजूनही कायम आहे.

ते 1975 च्या विश्व कप विजेत्या भारतीय हॉकी टीमचे मॅनेजर सुद्धा होते. बलबीर सिंह सीनियर केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक होते. देशाचे महान अ‍ॅथलेटीकमधील एक बलबीर सीनियर अंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीद्वारे निवडण्यात आलेल्या आधुनिक ऑलम्पिक इतिहासातील 16 महान ऑलम्पिक खेळाडूंपैकी एक होते.