Lockdown 3.0 : 15 मेपासून दारू घरपोच मिळणार पण ‘या’ मोठया अटीवर, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सरकारने गर्दी टाळण्यासाठी घरपोच मद्यविक्री करण्याचा निर्णय घेतल्याने मद्यप्रेमींना दिलासा मिळाला होता. मात्र ही सेवा घेण्यासाठी त्यांना अजून एक दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. येत्या 14 मे पासून घरपोच दारू देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, यामध्ये एक छोटासा बदल करण्यात आला आहे. आता घरपोच दारूची डिलिव्हरी 14 ऐवजी 15 मे पासून सुरु करण्यात येणार आहे. तसेच यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे.

केंद्र सरकारने देशातील दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच एका दुकानासमोर पाच ग्राहक, सोशल डिस्टनिसिंग अशी नियमावली तयार करण्यात आली होती. मात्र, याला देशभरात हरताळ फासत तळीरामांनी तोबा गर्दी केली. त्यामुळे पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीमारही करावा लागला. कोल्हापुरमध्ये तर वाईन शॉपसमोर दोन गटात राडा झाला होता. यामुळे राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये दारु विक्री बंद करण्यात आली होती.

काही जिल्ह्यामंध्ये दारू विक्री आणि काही जिल्ह्यांमध्ये दारू बंदी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे राज्याचा महसूल बुडत होता. यावर राज्य सरकारने तातडीने पैसे मिळवून देणाऱ्या व्यवसायांना प्राधान्याने सुरु करावे. त्यासाठी दारूची दुकाने सुरू करावीत, बांधकाम, पायाभूत सुविधा या व्यवसायांना गती द्यावी आणि सरकारने सुरु केलेल्या पायाभूत प्रकल्पांची कामे तातडीने सुरु करावीत, अशा शिफारसी तज्ज्ञांच्या अभ्यासगटाने केल्या आहेत. हा अहवाल शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला होता.

यावर मंगळवारी घरपोच मद्याची डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी अधिकाऱ्यांनी वेळ मागितल्याने ही मुदत एका दिवसाने वाढविण्यात आली आहे. डिलिव्हरी बॉयचे आरोग्य प्रमाणपत्र, सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज आदी वस्तूंचा पुरवठा करणे आणि पुरेशी तयारी करण्यासाठी ही वेळ मिळाली आहे. त्यामुळे 15 मे पासून ही होम डिलिव्हरी सुरु होणार आहे. यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे.

काय आहे ही अट ?

घरपोच दारू केवळ मद्य पिण्याचा परवाना असलेल्या व्यक्तिंनाच देण्यात येणार आहे. जर एखाद्याकडे हा परवाना नसेल तर तो दारू मागवू शकणार नाही. यासाठी वेगळी सोय उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. एखाद्या व्यक्तिला दारू मागवायची असेल तर त्याला एफएलएफ परवाना काढावा लागणार आहे. हा परवाना वाईन शॉप, बिअर शॉपवाल्यांकडूनच दिला जाणार आहे.

घरपोच दारू कशी मागवाल ?

घरपोच दारू मिळणार हे समजल्यापासून मद्यप्रेमींना एकच प्रश्न पडला आहे. तो म्हणजे दारू कशी मागवायची ? यासाठी व्हॉट्सअॅप, मेसेज, फोनचा वापर करता येणार आहे. दुकानदार त्याच्या दुकानाबाहेर ठळक अक्षरात त्याचा संपर्क क्रमांक लिहिणार आहे. त्याद्वारे त्यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जो वेळ दिला असेल त्याच वेळेत मद्य विकता येणार आहे. ग्राहकाला एमआरपीनेच मद्य विक्री करावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे कंटेनमेंट झोनमध्ये दारू घरपोच मिळणार नाही.