मुंबईत कंटेन्मेंट झोन वगळता सर्वत्र घरपोच दारू मिळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील मद्यप्रेमींसाठी चांगली बातमी आहे. कंटेनमेंट झोन वगळता संपूर्ण मुंबईत दारू घरपोच मिळणार आहे. मुंबई महापालिकेने शुक्रवारी (दि22) या संदर्भात पत्रक काढलं आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनाही मद्य घरपोच देता येणार आहे. उद्यापासून (शनिवार) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

राज्य सरकारनं काही दिवासांपूर्वीच राज्यात रेड झोन वगळता इतर सर्व भागांत सशर्त घरपोच दारू विक्रीला परवानगी दिली होती. मुंबईचा समावेश रेड झोनमध्ये असल्यानं दारूची घरपोच सेवा सुरु झाली नव्हती. मात्र, आता मुंबईत देखील घरपोच दारू मिळणार आहे. कंटेनमेंट झोन वगळता संपूर्ण शहरात घरपोच दारू विक्रीस महापालिकेने परवानगी दिली आहे. तसं पत्रक पालिकेने प्रसिद्ध केले आहे. तसेच ई-कॉमर्स कंपन्यांनाही घरपोच दारूची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मद्याच्या दुकानांत दारू विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे पत्रकात नमूद केलं आहे.

कंटेनमेंट झोन वगळता परवानाधाकर विक्रेत्यांना सीलबंद बाटलीतील मद्य परवानाधारक ग्राहकांना त्यांच्या घराच्या पत्यावर देता येणार आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. दुकानांतून मद्यविक्री करता येणार नाही. मद्यविक्रेते ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून घरपोच मद्य देऊ शकतील. राज्य सरकार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल, असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.