तळीरामांसाठी खुशखबर ! राज्यात दारूची होम डिलिव्हरी मिळणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने 3 मे नंतर दिलेल्या निर्देशानुसार काही सेवा सुरु करण्यात आल्या. ज्यामध्ये मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकानं उघडण्याची सशर्त संमती देण्यात आली. मात्र, त्या अटींचं उल्लंघन होऊ लागल्याने मुंबई-पुणे आणि इतर शहरांमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली होती. आता राज्य शासनाने मद्याची घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी सशर्त संमती दिली आहे.

अटी आणि नियमांनुसार भारतीय बनावटीचे विदेशी मद्य स्पिरिट्स, बिअर, सौम्य मद्य, वाईनची परवानाधारक मद्य विक्रेत्याला होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ ठरवून दिली जाणार आहे. त्या वेळेतच होम डिलिव्हरी करता येणार आहे. दारुची हेम डिलिव्हरीसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीला मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर वापर करावा, अशा सूचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.

डिलिव्हरी बॉईजची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, ओळखपत्र तसेच संपर्कातून कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी दुकानदाराची असणार आहे. ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी एक दिवस जाणार आहे. त्यामुळे 14 मे पासून ही होम डिलिव्हरीची सुविधा सुरु केली जाणार आहे.