आता बीड जिल्हयामध्ये होम आयसोलेशन बंद !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रसार आणि प्रशासनावरचा वाढता ताण लक्षात घेता रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे अशक्य झाले. म्हणून सरकारने कोरोना चाचणी सकारात्मक आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरणनाचे धोरण आखले. मात्र, राज्यात आणि मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु असलेली घरी विलगीकरणाची सुविधा बीड आणि हिंगोली जिल्ह्यात बंद करण्यात आली आहे.

मागील काही महिन्यांमध्ये एका हजारांहून रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. पण अपवादात्मक स्थितीतच (अपंग, मनोरुग्ण) अशाच रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने घरी विलगीकरणाची परवानगी देण्यात येते. परंतु, प्रशासनास घरी विलगीरकरणात असलेले रुग्ण बेजबाबदारपणे वागत असल्याचे (बाहेर फिरणे, एकच टॉयलेट वापरणे) काही प्रकरणात आढळून आले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात घरी विलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, गेल्या महिन्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सुद्धा घरी विलगीकरण बंद करा, परवानगी देऊ नका, असे आदेश दिले होते.

खासगी रुग्णालयात वाढला लोंढा

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता प्रशासनाने सध्या कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ यंत्रणा उभी केली असली तरी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना निष्कृष्ट जेवण, स्वच्छता, उपचारात दिरंगाई अशी ओरड सुरु होती. यामुळे सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेले रुग्ण घरी विलगीकरणात राहून उपचार घेतील असे धोरण राज्य सरकारने अवलंबले होते. सरकारच्या या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण काही हलका झाला होता. तद्वतच रुग्णांना घरच्या वातावरणात राहता येत होते. दरम्यान, घरी विलगीकरणाची परवानगी नाकारल्याने सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेले आर्थिक क्षमता असलेले रुग्ण आता खासगी रुग्णालयात भरती होत आहेत.