घर खरेदी करण्यासाठी खुशखबर ! गृहकर्जे झाली आणखी स्वस्त, ‘या’ 2 बँकांची व्याजदर कपात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) रेपो दरावर आधारित कर्जावरील व्याजदरात (बीआरएलएलआर) 0.15 टक्क्यांची कपात केल्याचे शनिवारी जाहीर केले. त्यामुळे आता गृहकर्जांसाठी (Home Loans) 6.85 टक्के दराने व्याज आकारण्यात येणार आहे. त्यामुळे घर खरेदी करू इच्छिणा-यांना त्यांच्या स्वप्नातले घर खरदी करणे शक्य होणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वैयक्तिक कर्जे घेणाऱ्या ग्राहकांचा फायदा होणार आहे, असे मत बँक ऑफ बडोदाचे महाप्रबंधक हर्षदकुमार सोळंकी यांनी व्यक्त केले आहे.

तत्पूर्वी बँकेने दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर गृह आणि वाहन कर्जांवर सवलत देण्याचे सूतोवाच केले होते. रेपो दरावर आधारित व्याजदरात कपात केल्यामुळे आता गृहकर्जांवर 6.85 टक्के, वाहन कर्जांवर 7.10 टक्के आणि शैक्षणिक कर्जांवर 6.85 टक्के दराने व्याज आकारण्यात येणार असल्याचे बॅंकेने नमूद केले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India) 30 लाखांवरील गृह कर्जासाठी व्याजदर10 बीपीएसने कमी केले आहेत. महिला कर्जदारांना आणखी सवलत मिळणार आहे. अशा प्रकारच्या कर्जांसाठी वरील कर्जांपेक्षा आणखी 5 बीपीएस सवलत मिळेल.31 डिसेंबर 2020 पर्यंत गृहकर्जासाठी शून्य प्रक्रिया शुल्क आकारले जाईल.यासोबतच युनियन बँक ऑफ इंडियाद्वारे कर्जाचा ताबा घेतला गेल्यास 10,000 रुपयांपर्यंतचे कायदेशीर तसेच मूल्यांकन शुल्क माफ केले जातील. व्याजदरातील या सवलती1 नोव्हेंबर 2020 पासून लागू झाल्या आहेत. कार आणि शैक्षणिक कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.

दरमहा तीनवेळा रक्कम भरता येणार
शनिवारपासून (1नोव्हेंबर) बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना बचत खात्यामध्ये दरमहा केवळ तीनवेळा रक्कम भरता येणार आहे. चौथ्यांदा रक्कम जमा केल्यास त्याना 40 रुपये द्यावे लागणार आहेत. जनधन खातेधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे. त्यांना कितीही वेळा रक्कम जमा करता येणार आहे. मात्र, रक्कम काढल्यास त्यांना 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.