‘अशा’ पद्धतीनं घरच्या घरीच तयार करा विविध प्रकारचे नैसर्गिक ब्लीच ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, पुळ्या अशा समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण ब्लीचचा वापर करतात. परंतु काहींना हे ब्लीच सूट होत नाही. त्यामुळं रॅशेस आणि जळजळ अशा समस्या येतात. परंतु आपण नैसर्गिक ब्लीचचा वापर केला तर दुष्परिणामांपासून दूर राहू शकतो. नैसर्गिक पद्धतीनं आपणं किती प्रकारे ब्लीच करू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) पपई – हे एक असं फळ आहे जे बाराही महिने उपलब्ध होतं. तुम्ही या फळापासूनही ब्लीच तयार करू शकता. यासाठी पपईचा गर काढा आणि तो हातानं बारीक करून घ्या. तयार झालेला लेप दिवसातून एकदा चेहऱ्यावर लावावा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हा प्रयोग रोज केला तर चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. जर चेहऱ्यावर काही डाग असतील तर तेही दूर होतात.

2) बटाटा – सौंदर्यात भर टाकण्यासाठी याचाही खूप फायदा होतो. बटाट्याच्या रसात एक चमचा मध मिक्स करून त्याचा लेप तयार करा. हा लेप चेहऱ्यावर लावा. चेहरा सुकल्यानंतर गार पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा प्रयोग एक दिवसाआड केला तर चेहऱ्यावरील ग्लो वाढतो.

3) लिंबू – लिंबाचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. नैसर्गिक ब्लीच म्हणूनही लिंबाकडे पाहिलं जातं. रोज रात्री जर लिंबाचा रस चेहऱ्याला लावला तर यामुळं चेहऱ्यावरील मृत पेशी नष्ट होतात.

4) टोमॅटो – टोमॅटोच्या रसामुळं चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. त्यामुळं दिवसातून एकदा रोज टोमॅटोच्या रसानं चेहऱ्यावर हलक्या हातानं मालिश करा. त्यानंतर काही काळ हा लेप चेहऱ्यावर वाळू द्या. लेप सुकल्यानंतर गार पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

5) दही – दह्यात मोठ्या प्रमाणात लॅक्टीक अ‍ॅसिड असतं. त्यामुळं एका वाटीत थोडसं दही घ्यावं. यानंतर दह्यानं हलक्या हातानं चेहऱ्यावर मसाज करावी. 10 मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यावा. दही हा नैसर्गिक पद्धतीनं ब्लीच करण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम पर्याय आहे. त्यामुळं त्वचा सॉफ्ट होण्यास मदत होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.