शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का ?, अमित शहांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मंदिर, रामलीला, मदरसे यावरुन भाजपने सध्या राज्यातील ठाकरे सरकार विरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरु आहेत. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सेक्युलर शब्दावरून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप मधील संबंध आणखीनच ताणले गेले आहेत. या संबंधावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केलं आहे.

शिवसेना, अकाली दलानं भाजपची साथ सोडली. शिवसेनेने गेल्या वर्षी भाजपची साथ सोडली. तर अकाली दलानं कृषी विधेयकांच्या मुद्यावरून एनडीएला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना आणि अकाली दल भाजपचे जुने मित्र पक्ष होते. त्यांनी भाजपशी फारकत घेतल्याने भाजपप्रणित एनडीएला धक्का बसला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप संबंधावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, एनडीएमध्ये आजही तीस पेक्षा जास्त पक्ष आहेत. शिवसेना आणि अकाली दलानं भाजपची साथ सोडली. आम्ही त्यांची साथ सोडली नाही, असं शहा यांनी म्हटले आहे.

शिवसेना, अकाली दलासोबत पुन्हा हातमिळवणी करणार का, त्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे खुले आहेत का, असे विचारण्यात आले. त्यावर अमित शहा म्हणाले, मी काही ज्योतिषी नाही. पण सध्या तरी ते (अकाली दल) कृषी विधेयकावर अडून राहिले आहेत. शिवसेना आणि अकाली दलाला आम्ही एनडीतून बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. ते स्वत:च एनडीएतून बाहेर पडले आहेत. त्याला आम्ही काय करु शकतो ? असं शहा यांनी म्हटलं.

राज्यपाल कोश्यारींच्या पत्राबद्दल नाराजी
राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावीत यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. हे पत्र खुपच वादग्रस्त ठरले होते. यातील आक्षेपार्ह भाषेमुळे राज्यपालांवर मोठी टीका झाली होती. आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या पत्राबाबत भाष्य केले असून कोश्यारी यांनी ते शब्द टाळायला पाहिजे होते, असे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अमित शहा बोलत होते.

मंदिरे खुली करण्याबाबत राज्य सरकार उशीर करत असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. यात कोश्यारी यांनी म्हटले होते की, तुम्ही आता अचानक सेक्युलर झाला आहात की काय? राज्यपालांच्या याच वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. याच वक्तव्यावरुन अमित शहा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज्यपालांनी काही शब्द टाळले असते तर बरे झाले असते. अमित शहा म्हणाले, मी ते पत्र वाचले. त्यांनी एक संदर्भ देताना पत्रात तसा उल्लेख केला. मात्र ते टाळायला हवे होत. राज्यपालांच्या पत्राबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनीच अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याने आता विरोधकांच्या आरोपाला बळ मिळाले आहे.