जामिया फायरिंग : गोळीबारासारखे प्रकार खपवून घेणार नाही – HM अमित शहा

दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी विरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ ते राजघाट मार्गापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान एका तरुणाने खुलेआम गोळीबार केला. या गोळीबारात आंदोलनातील एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी असले प्रकार खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. दोषीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीएए आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी आज मोर्चा काढण्यात आला होता. त्या दरम्यान दुपारी अचानक गोळीबार झाल्याने एकच गोंधळ उडाला. हल्लेखोरांने केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला. राजधानीमध्ये मोर्चावर थेट गोळीबार झाल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून गोळीबार करणाऱ्या दोषीलाकठोर शिक्षा देणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचे नाव रामभक्त गोपाल असल्याचे समोर आले आहे. तो उजव्या विचारसरणीच्या संघटनेचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे. रामभक्त गोपाल याने गोळीबाराच्या आधी फेसबुकवर काही पोस्ट केल्या आहेत.

अमित शहा यांनी म्हटले आहे, दिल्लीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांशी याबाबत चर्चा झाली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकार अशा कोणत्याही घटना खपवून घेणार नाही. या प्रकरणी गंभीरपणे कार्यवाही करणार असून दोषींना कठोर शिक्षा देण्यात येणार असल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले.