‘लोकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली… चिंता करू नका मी एकदम तंदुरूस्त आहे’, गृहमंत्री अमित शहांनी लिहीलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ते पूर्णपणे ठीक आहेत आणि कोणत्याही आजाराने ग्रस्त नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून लोक सोशल मीडियातून त्यांच्या आरोग्याबद्दल अफवा पसरवत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. अमित शहा यांनी ट्विट करून सर्व अफवांचे खंडन केले आहे. शहा म्हणाले की, लोकांनी माझ्या मृत्यूसाठी देखील प्रार्थना केली.

अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की-
“गेल्या कित्येक दिवसांपासून काही मित्रांनी सोशल मीडियावरून माझ्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरवल्या आहेत. काही लोकांनी तर ट्वीट करून माझ्या मृत्यूसाठी देखील प्रार्थना केली आहे.

देश सध्या कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढत आहे आणि देशाचा गृहमंत्री म्हणून रात्री उशिरापर्यंत माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे मी या सर्वांकडे लक्ष दिले नाही. जेव्हा हे माझ्या लक्षात आले तेव्हा मला वाटले की या सर्व लोकांनी त्यांच्या काल्पनिक विचारांचा आनंद लुटला पाहिजे, म्हणून मी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

परंतु माझ्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी आणि माझ्या हितचिंतकांनी गेल्या दोन दिवसांपासून बरीच चिंता व्यक्त केली आणि मी त्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणूनच आज मी हे स्पष्ट करू इच्छित आहे की, मी पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि मला कोणताही आजार नाही.

हिंदू समजुतीनुसार असा विश्वास आहे की, अशा अफवा आरोग्यास आणखी बळकट करतात. म्हणूनच मी अशा सर्व लोकांकडे आशा करतो की ते या व्यर्थ गोष्टी सोडून मला माझे कार्य करू देतील आणि स्वतःची कामे देखील करतील.

माझे शुभचिंतक आणि सर्व कार्यकर्त्यांचे माझी काळजी केल्याबद्दल आणि आरोग्याबाबत विचारल्याबद्दल आभार मानतो.

आणि ज्या लोकांनी अफवा पसरवल्या त्या लोकांबद्दल कोणतीही वाईट भावना किंवा द्वेष नाही. तुम्हालाही धन्यवाद.”

गृहमंत्री अमित शहा यांचे हे ट्विट रिट्विट करत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लिहिले आहे की- दीर्घायुष्य लाभो हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे.

तसेच केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीही रिट्विट करत म्हटले आहे की- तुम्ही निरोगी रहा आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा, हीच इच्छा आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही अमित शहा यांचे ट्विट रिट्विट करून हा संदेश लिहिला आहे.