दिल्ली हिंसाचारप्रकरणी HM शहांनी राजीनामा द्यावा : सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत आलेले असताना हिंसाचार होणे धक्कादायक आहे. हे गुप्तचर विभागाचे अपयश असून याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण द्यावे अन्यथा राजीनामा द्यावा असी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. ईशान्य दिल्लीत सीएए समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये सोमवारी वाद होऊन हिंसाचार झाला होता, या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, दिल्लीतील हिंसाचाराची घटना ही धक्कादायक आहे. दिल्लीमध्ये ट्रम्प साहेबांचा दौरा सुरु असताना तिथे दंगल होतेच कशी ? हे सर्वोतपरी गृहमंत्रालयाचे अपयश आहे. याचं स्पष्टीकरण गृहमंत्री अमित शहा यांनी देशाला द्यावं. गृहमंत्री अमित शहा यांना जर हे सांभाळणं जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात गल्लत होतेय
पुरोगामी महाराष्ट्रात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये गल्लत होतेय. माझ्यासारखी पिढी ही अंधश्रद्धेविरोधात काम करणारी शेवटची पिढी असल्याची भीती वाटायला लागली आहे. आज डॉ. नरेंद्र दाभोलकर नाहीत याची पोकळी सातत्याने जाणवत आहे. दाभोलकरांनंतर याविरोधात काम करण्यात आम्ही कमी पडत आहोत की काय असं वाटत आहे. पिंपरी चिंचडवड मध्ये अंधश्रद्धेतून झालेल्या पाच बहिणींवरील अत्याचारावर त्यांनी भाष्य केले.

उत्तर तेच सांगू शकतील
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांनी हा निर्णय का घेतला हे तेच सांगू शकतील. परंतु ट्रम्प यांच्या भेटीत सरकारने इतर पक्षांना फारसे सामावून घेतले नाही. बराक ओबामा जेव्हा भारत भेटीवर आले होते त्यावेळी मनमोहन सिंह यांनी सर्व पक्षीय नेत्यांना बैठकींना बोलावले होते.

विरोधकांना 5 वर्षासाठी शुभेच्छा
विरोधकांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. ते चांगल्या पद्धतीने विरोधीपक्षाचे काम करीत आहेत. आमचं सरकार हे दडपशाहीचं सरकार नाही. विरोधकांनी आता पाच वर्षे त्यांचे चांगल्या पद्धतीने काम करावं. हिंगणघाट प्रकरणावर बोलताना सुळे म्हणाल्या, आपलं गृहखातं सक्षम आहे. या प्रकरणी मुळाशी जाऊन काम करण्याच्या सुचनांचा विचार करून गृहमंत्रालय अशा घटना रोखण्यासाठी योग्य निर्णय घेईल.