दसर्‍याला भगवान बाबा गडावर गृहमंत्री अमित शहा, विश्‍वविक्रम होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या सावरगाव या जन्मभूमीत दस-याचे सीमोल्लंघन ही मोठी परंपरा आहे. ‘एक विधान, एक प्रधान, एक निशान’ सत्यात उतरवणारे व 370 कलम रद्द करून देश एकसंघ ठेवणारे व भारतीयांच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणा-या दसरा मेळाव्यास पिंपरी चिंचवडमधून पाच हजारांहून जास्त भगवान बाबा यांच्या भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी केले आहे.

8 ऑक्टोबर 2019 रोजी होणा-या दसरा मेळाव्याच्या पूर्व तयारीची बैठक दसरा कृती समिती पिंपरी चिंचवडच्या वतीने रविवारी (29 सप्टेंबर) शाहूनगर येथे घेण्यात आली. या वेळी नगरसेविका योगिता नागरगोजे, नगरसेवक केशव घोळवे, उद्योजक आबा नागरगोजे, रघुनंदन घुले, सुभाष ज-हाडे, दीपक नागरगोजे, आण्णा गर्जे, गणेश ढाकणे, अरुण गीते, श्रीनिवास बढे, अरुण पवार, विजय सोनवणे, कुसुमताई नागरगोजे, भागवत खेडकर, विनोद मुंडे, दत्ता कायंदे, बजरंग आंधळे, भास्कर खाडे, कैलास सानप, खंडू खेडकर, एस. एम. नाखाडे, हनुमंत घुगे आदींसह शंभराहून जास्त कार्यकर्ते उपस्थित होते

मुक्काम पोस्ट सावरगाव, तालुका पाटोदा, जिल्हा अहमदनगर येथे दरवर्षी भगवान बाबांचे लाखो भक्त दसरा मेळाव्याला उपस्थित राहतात. भक्तीची आणि एकजुटीच्या शक्तीची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याच्या सिमोल्लंघनासाठी या पूर्वीच्या मेळाव्यांना स्व. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाने लाखो भक्तांनी उपस्थिती दाखविली आहे. याही वर्षी हा दसरा मेळावा राज्यातील ऐतिहासिक मेळावा ठरावा असा निर्धार उपस्थित भगवान भक्तांनी केला.

मेळाव्यास उपस्थित राहणा-या भगवान भक्तांनी भगवान बाबाच्या प्रतिमेचा प्रत्येक 25 माणसांच्या मागे एक पताका (झेंडा) घेऊन यावे. तो भगवान बाबांच्या भव्य आणि दिव्य मुर्तीच्या समोर रोवण्याचा विश्वविक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत लाखो भक्तांच्या साक्षीने करण्याचे नियोजन आहे, असेही खाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Visit : policenama.com