‘त्या’ एका रात्रीत नेमकं काय झालं ? HM शहांचा शिवसेनेला ‘सवाल’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान केलेल्या शिवसेनेने राज्यसभेत विधेयकाच्या विरोधात मतदान करणार असल्याचे सांगितले. या विधेयकावर आज राज्यसभेत चर्चेदरम्यान विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. गुलाम नबी आझाद, कपील सिब्बल आणि पी. चिदंबरम यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अमित शहा यांना तुमच्या देशभक्तीचं प्रमाणपत्र आम्हाला नको असं सांगितलं. या सगळ्या प्रश्नांना अमित शहा यांनी सडेतोड उत्तर दिलं. या बिलावरून काँग्रेस आणि काही पक्ष संभ्रम निर्माण करुन मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण केले जात असल्याचा पलटवार त्यांनी काँग्रेसवर केला. तर एका रात्रीत भूमिका का बदलली असा खोचक सवाल करत त्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊत यांना टोला लगावताना शहा म्हणाले, सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात हे दिसून आलंय. लोकसभेत शिवसेनेनं विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र, एका रात्रीत त्यांनी आपली भूमिका बदलली. एका रात्रीत असं काय झालं की त्यांनी आपली भूमिका बदलली याचं उत्तर शिवसेनेने द्यावे. विधेयकला विरोध करणाऱ्यांना आम्ही देशद्रोही असं कधीही म्हटलं नाही, असे संजय राऊत यांना सुनावले.

Visit : policenama.com