वाधवान कुटुंबियांना पत्र दिल्याची IPS अधिकारी गुप्तांकडून ‘कबूली’, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यहार प्रकरणातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना आज (रविवारी) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) पथकाने महाबळेश्वर येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली. लॉकडाऊन काळात मुंबईहून महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या वाधवान कुटुंबियांना 7 एप्रिल रोजी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राज्याचे गृह विभागाचे सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी त्यांना लॉकडाऊनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देणारे पत्र दिले होते. याच पत्रामुळे त्यांनी मुंबई ते सातारा असा प्रवास केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.

देशात लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वाधवान कुटुंबियांना परवानगीचं पत्र दिल्याचं विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांनी कबूल केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून या चौकशीचा अहवाल लवकरच समोर येईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. मात्र, मधल्या काळामध्ये या पत्रावरून मोठं राजकारण करण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढतोय. अशा परिस्थितीत राजकारण करणं दुर्दैवी होतं, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

वाधवान कुटुंबातील काही जणांना कोरोना झाल्याचा संशय
लॉकडाऊन असताना देखील वाधवान कुटुंब महाबळेश्वरला पोहचलं. विशेष म्हणजे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला गाडीतून प्रवास केला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला. परंतु वाधवान कुटुंबाला सीबीआयने ताब्यात घेतलं नव्हतं. वाधवान कुटुंबापैकी सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली असू शकते, अशी शंका असल्याने सीबीआयने संपूर्ण कुटुंबाला क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता.