गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली भावना, म्हणाले – ‘माझ्या पोलिस कुटुंबातील सर्व सहकारी भगिनींप्रति कृतज्ञता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी अन महिला अधिकाऱ्यांना राज्याच्या गृहमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त करत ते करत असलेल्या कामाची प्रशसां केली असून, तुम्ही देखील दुर्गारूपी पोलीस दलाच्या शक्ती आहात असे उद्गगार काढले आहेत.

नवरात्र उत्सव सुरू असून, उद्या दसरा आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलातील महिला पोलीसांसाठी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच दसऱ्याच्या पूर्व संध्येला सर्वांना येणारे वर्ष सुख, शांती, समृद्ध व निरोगी जावो अश्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज नववा दिवस असून, आज वाईटावर चांगल्याचा विजय झाला, असा आहे.

दुर्गामाता संकटाच्या काळात जनतेच्या मदतीला धावून येते, त्याच प्रमाणे तुम्ही देखील समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस दलाच्या दुर्गा आहात. तुम्ही सर्वांचे रक्षण करण्यासाठी नेहमी सज्ज असता. विशेषत: कोरोनाच्या काळात समाजाचे रक्षण करण्याची आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची महत्वाची जबाबदारी तुम्ही जिकिरीने पार पडली. ती कौतुकास्पद आहे. तुम्ही हे कर्तव्य करत असताना तुम्हाला दोन भूमिका पार पाडाव्या लागत असतात. तुम्ही समाजातील कुटुंबाची जबाबदारी पार पाडता, तेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची देखील काळजी घ्यावी लागते. दोन्ही जबाबदाऱ्या खूप क्षमतेने पार पाडत असून, ते आम्ही अनुभवत आहोत.

तुम्ही कठोर परिश्रम व अथक प्रयत्न करत जनतेची सेवा करत आहात, त्याबद्दल मी सलाम करतो. दुर्गामाता जगाची शक्ती म्हणून ओळखली जाते व तुम्ही देखील दुर्गारूपाने पोलीस दलाच्या शक्ती आहात. पोलीस दलाचा कुटुंब प्रमुख म्हणून राज्यासाठी तुम्ही करत असलेल्या सेवेबद्दल आमच्या सर्वातर्फे हे पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त करतो. त्याग भावनेने आपण जे आपले आयुष्य जनतेसाठी समर्पित केले त्याबद्दल आपण सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.