राष्ट्रवादीवर मोठी नामुष्की ! अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी निघाले असून ते त्यांचा राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं ती फेटाळली आणि त्यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात सांगितले होते. उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली. त्यावर आज सुनावणी झाली. उच्च न्यायालयानं सीबीआयला 15 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांच्यावर राजीनाम्याबाबत दबाव वाढला.

दरम्यान, अनिल देशमुख हे गृहमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत अशी माहिती आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर मोठी नामुष्की ओढावली आहे. महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.