खा. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास SIT कडे; अनिल देशमुखांची मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी एसआयटी (SIT) मार्फत केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली. मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्याचे नाव असल्याचा आरोप काँग्रेसनं अनेकवेळा केला होता. त्यावरून डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आज गृहमंत्र्यांनी डेलकर यांच्या मृत्यूप्रकरणी एसआटी स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे.

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे सात वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी तणावातून आत्महत्या केल्याचे सुसाइड नोटमधून स्पष्ट होत आहे. दादरा-नगर हवेली प्रशासक प्रफुल्ल खाेडा पटेल यांचे नाव घेतले आहे. प्रफुल्ल खाेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. वारंवार अडचणी निर्माण केल्या जात होत्या, असं डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसंच, डेलकर यांच्या पत्नी व मुलगा यांनीही आपल्याला पत्र लिहित चौकशी करण्याची विनंती केली आहे, असं देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

मी मुंबईत येऊन आत्महत्या करतोय, त्रास मला तिकडे असला तरी इथे आत्महत्या करतोय. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय महाराष्ट्रातच मिळेल, असं मोहन डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं असल्याचे देशमुख यांनी म्हटलं आहे.