शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रेटींच्या ट्विटचा तपास करणार महाराष्ट्र सरकार, BJP च्या दबावाखाली तर नाही लिहीलं ना ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध सुरु आहे. तसेच बॉलिवूडचे अनेक दिग्गज, क्रिकेटर्ससह क्रीडा जगतातील अनेकांनी या प्रकरणावर ट्विट केले होते. त्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते.

शेतकरी आंदोलनादरम्यान ज्या दिग्गज व्यक्तींनी ट्विट केले होते, अशा लोकांच्या ट्विटची माहिती महाराष्ट्र सरकारकडून घेतली जाणार आहे. सरकारकडून ही माहिती घेतली जात असल्याने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की भाजपच्या दबावातून काही दिग्गज व्यक्तींकडून ट्विट केले गेले. भाजपने देशातील स्थिती धोकादायक बनवली आहे. भाजप पूर्णपणे अलोकशाहीच्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे सर्वचजण चिंतेत आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले, की राज्याच्या गुप्तचर एजन्सीकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे आणि या चौकशीतून सत्य परिस्थिती काय आहे, याची माहिती घेणार आहोत.

दरम्यान, भाजप नेते राम कदम यांनी देशमुख यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की देशाच्या हितात सेलिब्रिटींनी ट्विट करणे हा काय गुन्हा आहे का? या सर्व दिग्गज मंडळींची माफी मागून घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.

राज्य सरकारकडून सुरक्षा द्यावी
जर हे सर्व दिग्गज दबावात आहेत तर त्यांना राज्य सरकारकडून सुरक्षा द्यायला हवी. तसेच त्यांच्यावर खरचं दबाव टाकला जात आहे का याची माहिती घेण्यासाठी चौकशी करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.