गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला शांताबाईंना ‘भरोसा’, एक लाखाची मदत देवुन सांगितलं सरकार ज्येष्ठांच्या प्रश्नांवर ‘संवेदनशील’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परिस्थितीमुळे वयाच्या ८५ व्या वर्षीही रस्त्यावर कसरती करून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालविणा-या शांताबाई पवार यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडी सरकार संवेदनशिल आहे. त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

पुण्यातील हडपसर परिसरातील शांताबाई पवार या कसरतीचे खेळ दाखवून आपल्या कुटुंबाचे पोट भरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांना हे समजले. शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी आवर्जून शांताबाईची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने त्यांना एक लाख रुपये, साडीचोळी आणि इतर मदत करण्यात आली. या वेळी आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेश समिती सदस्य प्रदीप देशमुख, नगरसेवक आनंद अलकुंटे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा सेल मार्फत १५ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना मदत केली आहे. पोलीस सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियातून शांताबाई यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यामुळेच पुणे पोलीसांच्या भरोसा सेलचेच काम पुढे नेण्यासाठी शांताबार्इंना मदत केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत सरकार संवेदनशिल आहे. कोरोना संकटाच्या काळात ज्येष्ठांची आबाळ होणार नाही, असा विश्वास या निमित्ताने मी देतो.