नक्षलवाद्यांशी लढणारे जुन्नरचे सुपुत्र नागेश भास्कर यांचा गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गोंदिया येथे कार्यरत असताना नक्षलवाद विरोधी केलेल्या कारवाईत सक्रीय सहभाग घेणारे आणि नक्षलवाद्यांचे मनसुबे उधळून लावणारे पोलीस उपनिरीक्षक आणि जुन्नरचे सुपुत्र नागेश खंडु भास्कर यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते गोंदिया येथे पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

नागेश भास्कर हे सध्या पुणे पोलीस दलातील बाँम्ब शोधक व नक्षल पथकात सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत.

नागेश भास्कर हे मुळचे जुन्नर तालुक्यातील राहणारे असून ते २००१ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झाले. त्यांनी दहशतवाद विरोधी पथका (पुणे एटीएस) मध्ये काम करीत असतना गोल्डन कॉरिडॉर कमिटीच्या सदस्याला पकडले होते. त्यानंतर त्यांची बदली गोंदिया जिल्ह्यात झाली होती. तेथे कार्यरत असताना त्यांनी ऑल इंडिया नक्षल कमिटी सदस्याला पकडण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत नागेश भास्कर यांनी केलेल्या गोळीबारामुळे नक्षलवाद्यांचा कट उध्वस्त झाला होता. त्याचबरोबर त्यांनी या नक्षलग्रस्त भागात आदिवासी विकासांच्या योजना राबविल्या होत्या. त्यातून तेथील जनतेमध्ये शासनाविषयी व पोलिसांविषयीचे मत बदलण्याच्या प्रयत्नांना यश आले होते.

अति संवेदनशील नक्षलग्रस्त भागातील जनतेसाठी केलेल्या उल्लेखनीय व खडतर सेवेबद्दल त्यांना महाराष्ट्र सरकारने विशेष सेवा पदक तसेच केंद्र सरकारने आंतरिक सुरक्षा सेवा पदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

गोंदिया येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नागेश भास्कर यांना गृहमंत्री अनिल देशमुख्र यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.