Nagpur News : सर्वच शहरात ‘हायटेक सायबर’ पोलीस स्टेशन तयार करणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली घोषणा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  भविष्यात सायबर गुन्हेगाराकडून सर्वाधिक धोका आहे. आतापर्यंत सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाल्याचा आकडा कोटींमध्ये आहे. त्यामुळे तब्बल 900 कोटींचा सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट तयार करण्यात आला असून काही दिवसांतच जवळपास सर्वच शहरात ‘हायटेक सायबर पोलीस स्टेशन’ तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

नागपुरमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या महासंचालक कार्यालयाच्या शिबिर कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख पुढे म्हणाले, येत्या काळात सायबर गुन्हेगारांमुळे पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. त्यामुळे समस्या निर्माण होण्यापूर्वीर खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी नऊशे कोटी रुपये खर्च करुन सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट तयार करण्यात आला असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

तीन महिन्यात ‘प्रोजेक्ट 112’ सुरु करण्यात येणार

सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टमध्ये टेक्निकल तपास, अद्यावत ट्रेनिंग, डाटा सिक्युरिटी इत्यादीचा समावेश आहे. येत्या गणराज्य दिनी मुंबईत पाच सुसज्ज असे सायबर पोलीस स्टेशनचे लोकार्पण होणार आहे. येत्या तीन महिन्यात ‘प्रोजेक्ट 112’ सुरु करण्यात येणार असून याद्वारे इमर्जन्सी क्रमांकावरुन आलेल्या फोन नंबरवरुन तात्काळ महिला किंवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्याचे टार्गेट असणार आहे. यासाठी अडीच हजार दुचाकींची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.