वारकऱ्यांच्या वेशात विठुरायाचं दर्शन, गृहमंत्र्यांनी घातलं साकडं

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आषाढी वारी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर सुरक्षा व आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला भेट दिली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वारकऱ्यांच्या वेशात विठुरायाचे दर्शन घेतले. महाद्वार चौकातून गृहमंत्र्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शन घेतेवेळी गृहमत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला साकडं घातलं.

विठू माऊली तू माऊली जगाची… आर्त साद तुज ही कोरोना मुक्तीची, असे म्हणत राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी विठ्ठलाकडे प्रार्थना केली. संपूर्ण जग, भारत आणि महाराष्ट्रातून या कोरोना विषाणूला घालव व शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच चालू होण्यासाठी आशिर्वाद असू द्या, असं साकडं विठ्ठला चरणी गृहमंत्र्यांनी घातलं.

 

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोनांची माहिती घेतली. शतकांपासून सुरु असलेली ही परंपरा कायम रहावी, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी गृहमंत्री वारकऱ्यांच्या वेशात होते. गळ्यात तुळशीचा हार व हातात वीणा घेऊन त्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार भारत भालके उपस्थित होते.