मानाच्या 9 पालख्या हेलिकॉप्टरने पंढरीत येतील : गृहमंत्री अनिल देशमुख

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरीची वारी ही वारकऱ्यांचे जीवन असून पांडुरंग हा त्यांचा आत्मा आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा वारी रद्द केल्याने 30 जूनला राज्यातील विविध भागातून येणाऱ्या मानाच्या नऊ पालख्या हवामानाचा अंदाज घेऊन विमानाने किंवा हेलीकॉप्टरने पंढरपुरात आणण्याच्या या पर्यांयांची चाचपणी सुरु आहे. याबाबत काही दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

दरवर्षी पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी वारी मोठ्या उत्साहात साजरी होते. मात्र, यंदा कोरोनाचे वैश्विक संकट राज्यावर आले आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी घरी राहूनच पांडुरंगाची सेवा करावी. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही आणि सर्वांचा जीव सुरक्षित राहील. मानाच्या पालख्या हवाई मार्गाने किंवा रस्त्यावरून येतील, याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

पास ग्राह्य धरले जाणार नाहीत
वारीसाठी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पास दिले आहेत, ते रद्द करावेत. कोणतेही पास वारीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, असेही अनिल देशमुख यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. सोलापूर जिल्ह्यातील मृत्यूदर राज्यात अव्वल असल्याने गृहमंत्री, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्ता भरणे आदींनी सोलापूरचा दौरा केला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

वारीबाबत गृहमंत्री काय म्हणाले
30 जूनपर्यंत सर्व मानाच्या पालख्या पंढरीत दाखल होतील.
1 जुलै रोजी पालख्या चंद्रभागा नदीत स्नान करतील
प्रदक्षिणा झाल्यानंतर त्यांच्या मठात दाखल होतील, पालख्यांसोबत एकूण 18-20 वारकरी असतील
2 जुलै रोजी मंदिरात पालख्यांची भेट होईल आणि तेथून सायंकाळी आपापल्या ठिकाणी प्रस्थान करतील.
वारीसाठी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना पास दिले आहेत, ते ग्राह्य धरले जाणार नाहीत