गृहमंत्र्यांच्या ‘त्या’ tweet मुळे अमरावतीकरांची वाढली धडधड; पोलीस अधिकारी, राजकारण्यांना करुन घ्यावी लागणार कोरोना चाचणी

अमरावती : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे शुक्रवारी Tweet करुन जाहीर केले. आदल्याच दिवशी गुरुवारी देशमुख यांनी अमरावतीचा दौरा केला होता. दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमांमुळे त्यांचा शेकडो लोकांशी संपर्क आला. त्यामुळे त्या सर्वांची आता धडधडे वाढली आहे.

अनिल देशमुख यांनी गुरुवारी पोलीस दलाची बैठक घेतली. त्यात अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हाधिकारी हे त्यांच्या संपर्कात आले होते. इतरही अनेक पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांशी त्यांचा संपर्क झाला होता.

त्यानंतर देशमुख यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह पक्षाने जिल्ह्यातील अनेक महत्वाचे पदाधिकारी, कार्यकते त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे हे सर्व जण गृहमंत्र्यांच्या Tweet नंतर धास्तावले आहेत.

विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला तरी अमरावतीत अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. अमरावतीत बुधवारी १७९, गुरुवारी १५८ आणि शुक्रवारी २३३ असा कोरोनाचा आलेख वाढता रहात आला आहे.