ITBP च्या 7 नव्या ‘बटालियन’ला मिळाली ‘मान्यता’, चीन सीमेवर भारताची वाढेल ‘ताकद’ !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सुरक्षा दलांची ताकद वाढवण्यासाठी सतत काम करत आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गृह मंत्रालयाने तात्त्विकदृष्टया मान्य केले आहे की लवकरच 7 नवीन बटालियन आयटीबीपीला देण्यात येतील.

सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत यासाठी कॅबिनेट नोट आणली जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर नव्या बटालियनसाठी सैनिकांची निवड सुरू होईल. आयटीबीपीचे हे प्रकरण गेल्या कित्येक वर्षांपासून अडकले होते, परंतु सध्या भारत-चीन सीमेवर ज्या प्रकारे परिस्थिती आहे, त्यादृष्टीने सरकारला कोणताही मार्ग सोडण्याची इच्छा नाही. आयटीबीपीला लवकरच 7 बटालियन मिळणार आहेत, ज्या भारत-चीन सीमेवर वेगवेगळ्या बीओपीमध्ये तैनात केल्या जातील.

गृहराज्य मंत्रालयाच्या सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला कळविले आहे की 7 बटालियन मिळाल्यानंतर एकूण 47 बीओपीवर सैनिकांना तैनात करता येईल. यातील 39 बीओपी अरुणाचल प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात आहेत. तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लडाखच्या काही बीओपीमध्ये आयटीबीपीचे जवान तैनात असतील. दरम्यान अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या चीन सीमेवर चीनच्या सैन्याकडून दररोज घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात असतो, त्यावर आयटीबीपी सतत नजर ठेऊन असते. आता या बटालियनच्या संख्येत वाढ झाल्याने सैनिकांची अतिरिक्त तैनाती सीमेवर केली जाईल.

भारत-चीन सीमेवर भारतीय सैन्यासह लडाखपासून ते अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचलपासून ते उत्तराखंडपर्यंत आयटीबीपीचे जवान तैनात आहेत. चिनी सैनिक या भागात सतत लक्ष ठेवून असतात. अरुणाचल प्रदेशात आयटीबीपीच्या एका पोस्टपासून दुसर्‍या पोस्टचे अंतर अनेक ठिकाणी 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत चिनी सैनिकांच्या घुसखोरीची माहिती योग्य वेळी मिळत नाही.

डोंगराळ व जंगलातील भागात गस्त घालणे सोपे नसते आणि छावण्यांमधील अंतर अनेक किलोमीटर असल्यामुळे ही समस्या आणखीनच गुंतागुंतीची बनते. हेच कारण आहे की हे अंतर कमी करण्यासाठी सुमारे 7000 सैनिक आणण्याची मागणी होत होती. आता ही मागणी गृह मंत्रालयाने तत्वतः मान्य केली आहे. लवकरच आयटीबीपीला सैनिक मिळतील आणि त्यांची नेमणूक सीमेवर होईल.