दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांना मुदतवाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांचा कार्यकाळ एक महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. अमूल्य पटनायक शुक्रवारी (दि.31) सेवानिवृत्त होणार होते. गृह मंत्रालयाने अमूल्य पटनायक यांचा कार्यकाळ एक महिन्यांनी वाढवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने गृहमंत्रालयाच्या मागणीनुसार पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांना मुदतवाढ देण्यास परवानगी दिली.

गृहमंत्रालयाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांचा कार्यकाळ एक महिन्यांनी वाढण्याची परवानगी मागितल्याचे वृत्त एका वृत्तवाहीने दिले आहे. दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांचा कार्यकाळ 31 जानेवारी रोजी संपत असून ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि आपल्याच कर्मचाऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यातच पुढील महिन्यामध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. दिल्लीत 8 फेब्रुवारीला 70 जागांसाठी मतदान होत आहे, तर 11 फेब्रुवारीला निकाल घोषीत होणार आहेत.

अमूल्य पटनायक हे 1985 बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. पटनायक यांची 2017 मध्ये दिल्ली आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या मंजुरीनंतर दिल्ली गृह विभागाने 8 जानेवारी रोजी त्यांच्या सेवा निवृत्तीचे आदेश काढले होते.