पंतप्रधान कार्यालयानंतर ‘या’ मंत्रालयात अधिकारी : मंत्र्यांची रेलचेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोलिसनामा ऑनलाईन दिल्लीतील नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमधून सत्ता चालविली जाते असे म्हंटले जाते. मंत्रालयाची अधिक महत्वाची कार्यालये या भागात दिसून येतात. नवीन सरकार निवडून आल्यानंतर उत्तर ब्लॉकमध्ये गेल्या काही दिवसांपासून हालचालींना वेग आला आहे. यामध्ये सगळ्यात जास्त गृह मंत्रालय अधिक सक्रिय दिसून येतेय. गेल्या आठवड्यात अमित शहा यांनी गृहमंत्रालयाच्या कार्यभार स्वीकारल्यानंतर या ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच कॅबिनेट मंत्री यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. आतापर्यंत, सरकारच्या महत्वपूर्णत्वाच्या क्रमवारीमध्ये पंतप्रधान कार्यालयानंतर अर्थमंत्रालयाचा क्रमांक येतो. परंतु आता अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थमंत्रालयाची जागा गृहमंत्रालयाने घेतल्याची दिसून येत आहे.

मंगळवारी अमित शहा यांच्या कार्यालयात वेगवान बैठका झाल्या. यामध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल तसेच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान सहभागी झाले होते. कोणीही बैठकीच्या उद्देशाबाबत खुलासा केला नाही.

पियुष गोयल म्हणाले की, मी या ठिकाणी माझ्या सहकारी मंत्र्यासोबत चहा प्यायला आलो होतो. पेट्रोलियन मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गंभीरपणे सांगितले की, अमित शहा पक्षाचे प्रमुख असल्यामुळे अमित शहा यांची मंत्री आणि नेत्यांनी भेट घेणे स्वाभाविक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीमध्ये नीती आयोगाचे अधिकारी देखील सामील होते. यामध्ये पेट्रोलियमच्या तांत्रिक मुद्यावर चर्चा झाली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशाप्रकारची बैठक पहिल्यांदाच होताना दिसून येतेय. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, अमित शहा यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर अमित शहा आहेत, याचे संकेत देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा सत्तेच्या केंद्रस्थानी असतील याचेच हे संकेत आहे.