शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, दिल्लीतील इंटरनेट, टेलिकॉम सेवा बंद ठेवण्याचे गृहमंत्रालयाकडून आदेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले असून पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. आंदोलक शेतकरी हातात लाठीकाठी आणि तलवारी घेऊन उतरल्याने परिस्थिती चिघळली आहे. मात्र हे हिंसक आंदोलन अजून पेटू नये, अफवांना आळा बसावा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने दिल्लीतील सिंघू, टिकरी, गाजीपूर बॉर्डर, नांगलोई, मुकरबा चौक परिसरातील इंटरनेट सेवा आज रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकरी आंदोलन हिंसक वळण घेत असल्याने इंडिया गेटकडे जाणारे सर्व रस्ते बंद ठेवले असून पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आणि राष्ट्रपती भवनाबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. तसेच सर्व महत्वाच्या व्यक्तींच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे. दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर येणारे दरवाजे बंद केले आहेत.

गेल्या 70 दिवसांपासून कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. आज शेतकऱ्यांकडून दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लाल किल्ला परिसरात आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र असून तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाचे दृश्य पहायला मिळत आहे.