गृह मंत्रालयाच्या पेजवर ‘त्या’ बाटल्यांचे फोटो, सामान्य संभ्रमात

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये अम्फन या चक्रीवादळाने हाहाकार माजवला होता. या वादळाची तीव्रता इतकी होती की दोन्ही राज्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही राज्यांच्या दौरा करत मदतीची घोषणा केली होती. परंतु याच दरम्यान एका अधिकार्‍याची एक चूक गृहमंत्रालयाला मोठी महागात पडली. एका कर्मचार्‍याने गृह मंत्रालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पश्चिम बंगालमधील अम्फान चक्रीवादळादरम्यान करण्यात आलेल्या मदतीचे फोटो शेअर केले होते.

यासोबतच त्या अधिकार्‍याने नजरचुकीने मद्याच्या बाटल्यांचेही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. ‘एनडीआरएफच्या टीमद्वारे पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील पांचला ब्लॉकमधील देउलपूर येथे काम सुरू आहे,’ या शीर्षकाखाली हे फोटो गृहमंत्रालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आले होते. गृहमंत्रालयाचे सोशल मीडिया हँडल हाताळणार्‍या अधिकार्‍याची ही चूक युझर्न त्वरित पकडली. या पोस्टमध्ये पश्चिम बंगालमधील मदतीच्या फोटोंसहित मद्याच्या बाटल्यांचे फोटोही शेअर करण्यात आले होते.

ही चूक लक्षात येताच गृहमंत्रालयाकडून ही पोस्ट डिलिट करण्यात आली. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नकळत झालेली चूक असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. गृहमंत्रालयाचे हे पेज हाताळणार्‍या व्यक्तीने कदाचित दोन्ही फोटो एकत्र शेअर केले. चूक समजल्यानंतर संबंधित व्यक्तीने लेखी स्वरूपात माफीही मागितल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणावरून अनेक नेटकर्‍यांनी टीकादेखील केल्याचे दिसून आले.