उत्कृष्ट तपासासाठी गृह मंत्रालय राज्यातील 10 पोलिस अधिकार्‍यांचा करणार सन्मान, पुण्यातील शिवाजी पवार अन् नाशिकमधील समीर शेख यांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांना नाशिक येथील मुथुट फायनान्सवरील दरोडा प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करुन गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रकरणात कोणतेही धागेदोरे हाती नसताना आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला होता.

मुथुट फायनान्समध्ये गोळीबार करून दरोडा टाकण्यात आला होता. या घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांसमोर आव्हान होते. गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात पथके पाठवून गुन्हेगाराचा शोध घेण्यात आला होता. सहायक पोलीस आयुक्त समिर शेख यांनी घटनास्थळावर मिळालेल्या वस्तू आणि तक्रारदाराचा जबाब आणि इतरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करून गुन्हा उघडकीस आणला होता.

महाराष्ट्रातील या अधिकाऱ्यांचा होणार सन्मान
1. शिवाजी पंडीतराव पवार (ACP – Pune)
2. राजेंद्र सीद्राम बोकडे (Inspector)
3. उत्तम दत्तात्रय सोनवणे (Inspector)
4. नरेंद्र कृष्णराव हिरवे (sr.Inspector)
5. श्रीमती. ज्योती लक्ष्मण क्षिरसागर (SP)
6. अनिल तुकाराम घेर्डीकर (SDPO)
7. नारायण देविदास शिरगांवकर (Dysp)
8. समीर शेख (ACP – Nashik)
9. किसन भगवान गवळी (ACP)
10. कोंडीराम रघू पोपरे (Inspector)
21 महिलांसह 121 पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान

गृह मंत्रालयाने (एमएचए) त्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली, ज्यांना ‘तपासणीतील उत्कृष्टते’साठी पुरस्कृत केले जाते. हा पुरस्कार मिळणाऱ्या कर्मचार्‍यांपैकी 15 सीबीआय, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांचे प्रत्येकी 10, उत्तर प्रदेश पोलिसांचे 8, केरळ आणि पश्चिम बंगाल पोलिसांचे प्रत्येकी 7 आणि उर्वरित इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आहेत. यात 21 महिला पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.