वाधवान कुटुंबीयांवर ‘मेहेरबान’ असलेल्या  गुप्ता यांच्यावर राज्य सरकारकडून ‘कारवाई’

पोलिसनामा ऑनलाईन टीम –  राज्यात लॉकडाउनची अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह 23 जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने  खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिली होती. यापृकरणी सरकारने अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

राज्यात कोरोनामुळे लोक घराबाहेर पडणार नाही, यासाठी सरकारकडून आवाहन करण्याबरोबरच पोलीस कारवाईही केली जात आहे. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट असून, महामार्गावरून अत्यावश्यक सेवा आणि जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे वाहनेच धावत आहेत. लॉकडाउन असलेल्या परिस्थितीत ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान हे कुटुंब आणि इतरांसह सुटीसाठी महाबळेश्वरला गेल्याचे  उघड झाले आहे. पाचगणी पोलिसांनी कपिल वाधवान यांच्या 23 जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना प्रवास करु द्यावा, अशा आशयाचे गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या स्वाक्षरीचे पत्रही समोर आले आहे.  हे प्रकरण माध्यमात आल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करणारे ट्विट केले आहे. त्यामध्ये ‘वाधवान यांच्यासह 23 जण महाबळेश्वरला कसे पोहोचले याची चौकशी केली जाईल,’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेप्रमाणे गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात चौकशी केली जाणार असून, चौकशी होईपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील,’ असेही देशमुख यांनी म्हटले आहे.