राज्यात 5.5 लाख लोक होम क्वारंटाईन

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे या कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयित अशा ५ लाख ६५ हजार ६२६ जणांना आतापर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, परिचारिका हे अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु, त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोक करीत आहेत. आतापर्यंत पोलिसांवर हल्ला करण्याच्या २४८ घटना घडल्या असून त्यात ८३० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात होम क्वारंटाईनचा शिक्का मारला असतानाही बाहेर फिरणार्‍या ६९५ व्यक्तींना शोधून पोलिसांनी त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले आहे. २२ मार्च ते २५ मे दरम्यान कलम १८८ नुसार राज्यात १ लाख १५ हजार २६३ गुन्हे दाखल करण्यात आले असून २३ हजार २०४ जणांना अटक केली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ४८ लाख ६२ हजार ९४७ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. अवैध वाहतूक करणार्‍या १ हजार ३२२ वाहनांवर गुन्हे दाखल केले असून ७२ हजार ६८७ वाहने जप्त करण्यात आली आहेत.