चंद्रपुरात परतलेल्या 31 हजार नागरिकांचा होम क्वारंटाइन पूर्ण

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढत असल्यामुळे गावी परतणार्‍यांची संख्या वाढली आहे. शिक्षण, नोकरी व रोजगाराच्या निमित्ताने परराज्यात आणि अन्य जिल्ह्यांमध्ये गेलेले सुमारे 33 हजार नागरिक लॉकडाउदरम्यान परवानगी घेऊन पुन्हा चंद्रपूरमध्ये दाखल झाले आहेत. यांपैकी 31 हजार 138 नागरिकांनी 14 दिवसांचा होम क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. तर 2 हजार 550 नागरिक अद्यापही होम क्वारंटाइनमध्ये आहेत. बाहेरून येणार्‍या नागरिकांकडूनच कोरोनाचा धोका असल्याने त्यांनी माहिती लपवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बाहेरून येणार्‍या नागरिकांबाबत पोलीस प्रशासन अतिशय गंभीर असून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. ही तपासणी स्वतःसाठी व कुटुंबासाठी आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्याच यंत्रणेला चुकवून जरी कोणीही जिल्ह्याच्या कोणत्याही भागात वा शहरात पोहोचले असेल तर सामाजिक दायित्व म्हणून स्वतःची माहिती आरोग्य विभागाला देण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाउन लागल्यापासून अनेक कर्मचारी कार्यालयात पोहोचले नाही, अशा कर्मचार्‍यांनी तातडीने आपापल्या कार्यालयात रुजू होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी निर्देश काढले आहेत. या काळात नियमित कामकाज सुरू करण्यात यावे संबंधित पोलीस विभागाची परवानगी घेऊन कर्तव्यावर रुजू व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोटा येथे विविध परीक्षांची तयारी करण्यासाठी गेलेले जिल्ह्यातील 39 विद्यार्थी अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली असून त्याचा लाभ चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांनाही मिळेल अशी अपेक्षा आहे. नागपूर यवतमाळ हे दोन जिल्हे रेड झोनमध्ये असून भंडारा जिल्ह्यांमध्ये देखील रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याच्या सीमांवरून प्रवेश करताना विनापरवाना कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. त्यासाठी नाकाबंदी आणखी कडक करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिले आहेत.