पुण्यात होम क्वारंटाईन केवळ नावापुरतेच ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुण्यातून एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. परराज्यातून आलेले आणि घरी अलगीकरणाची सक्ती असलेले विमान प्रवासी निर्धास्तपणे घराबाहेर फिरताना दिसत असल्याचे महालिकेच्या निदर्शनास आलं आहे. हातावरती शिक्का असताना, त्यांच्यावर कोणतीही यंत्रणा लक्ष देत नाही. यामुळे तीन महिन्यांत विविध राज्यांतून आलेल्या दोन लाख प्रवाशांनी अलगीकरण नावापुरतेच पाळले का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

टाळेबंदीत शिथिलता आणल्यानंतर देशांतर्गत विमानसेवा सुरु झाली. त्यानंतर विविध राज्यातून पुण्यात दररोज सुमारे साडेतीन ते पावणेचार हजार प्रवाशी येवू लागले. या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी लोहगाव विमानतळावर अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. प्रवाशी कोठून आला, त्याची कारणे, मुक्कामाचे ठिकाण, कालावधी याची पूर्तता करण्यात येते. मग प्रवाशांना सात दिवसांच्या कालावधीत आरोग्याच्या कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाही, याची हमी संबंधिताकडून घेतली जाते. त्याच अनुषंगाने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल, अशी शक्यता महापालिकेला होती. पण, अशा प्रवाशांचा सार्वजनिक ठिकाणी वावर वाढल्याचे समोर आले आहे.

शिक्का पुसला जातो

प्रवाशांच्या हातावर अलगीकरणात राहण्याच्या कालावधी संदर्भात विमानतळावर शिक्का मारण्यात येतो. मात्र, या शिक्क्याच्या शाईचा दर्जा निष्कृष्ट असल्याने तो काही तासातच पुसला जातो. तर काही प्रवाशी तो धुवून काढतात. या दरम्यान एखाद्या यंत्रणेकडून चौकशीसाठी फोन आला तर तो घेतला जात नाही अथवा तो लागत नसल्याचं महापालिकेच्या निदर्शनास आलं आहे.

… तर कारवाई केली जाणार

महाराष्ट्रा बाहेरुन येणारे प्रवाशी घरातून बाहेर पडणार नाहीत, त्यासाठी प्रत्येकाची माहिती आपत्ती विभागाकडे दिली जाते. घरच्या पत्त्यासोबत मोबाइल क्रमांकाचाही समावेश असल्याने रुग्ण नेमका कुठे आहे, याची माहिती मिळविणे शक्य होते. पण ते इतरत्र फिरताना आढळल्यास
कारवाई केली जाईल, असे पुणे महापालिका उपायुक्त अशोक घोरपडे यांनी सांगितलं.

परराज्यातून पुण्यात आलेले प्रवाशी

तीन महिन्यांत १ लाख ९५ हजार
रोज येणारे ३७०० प्रवाशी
तपासणीसाठी ६ अधिकारी-कर्मचारी