खोकल्यासारख्या समस्येवर करा अद्रक-दालचिनीचा घरगुती उपाय

पोलिसनामा ऑनलाइन – अनेकजण साधा खोकला झाला तरी केमिस्टमधून अलोपॅथी औषध आणून ते घेतात. मात्र, याचे दुष्परिणाम होऊ शकतात. खोकला हा त्या मानाने छोटा आजार असून त्यावर आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय करणे अधिक चांगले आहे. घरगुती उपाय करून खोकला घालवणे सोपे आहे. खोकल्यावर घरगुती उपचार कोणते, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

खोकला दूर करण्यासाठी एक कप पाण्यात एक अद्रकाचा तुकडा, चिमूटभर दालचिनी आणि मिरे टाकून उकळून घ्यावे. हे पाणी कोमट झाल्यावर गाळून मध मिसळून प्यावे. या उपायाने खोकल्यात चांगला आराम मिळतो. तसेच लसणाच्या ३-४ पाकळ्या आणि अर्धा चमचा हळद एक ग्लास दुधामध्ये टाकून उकळा. रोज रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. आणखी एक उपाय म्हणजे एक चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून रोज सकाळी उपाशीपोटी घेतल्यास आराम मिळतो. एक कप पाण्यात ४-५ लवंगा टाकून उकळवाव्यात. हे पाणी कोमट झाल्यानंतर यामध्ये अर्धे लिंबू पिळावे आणि एक चमचा मध मिसळून प्यावे.

खोकल्यावर आणखी एक गुणकारी औषध म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये ४-५ पाकळ्या लसूण टाकून गरम करा. झोपण्यापूर्वी या कोमट तेलाने पायाच्या तळव्यावर आणि छातीवर मालिश करा, हा उपाय केल्यास खोकल्याचा त्रास कमी होतो. तसेच एक कप पाण्यात अर्धा चमचा ज्येष्ठमधाची पावडर आणि ८-१० तुळशीची पाने टाकून उकळा. हे कोमट करण्याऐवजी चहाप्रमाणे प्यावे.

दुसरा उपाय म्हणजे तव्यावर तुरटी भाजून घ्या. याची पावडर बनवून गुळासोबत नियमित घेतल्याने फायदा होतो. तसेच जवस आणि तीळ समान प्रमाणात मिसळून भाजून घ्यावे. याची पावडर तयार करून सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्यासोबत एक चमचा घेतल्यास खोकला बंद होतो.