धक्कादायक ! घरात सॅनिटायझेशन करताना आग लागल्याने महिलेचा मृत्यू, नाशिकमधील वडळागावातील घटना

नाशिक  : पोलीसनामा ऑनलाईन –   नाशिकमध्ये वडाळागावात घरात सॅनिटायझेशन करताना मेणबत्तीच्या संपर्कात आल्यामुळे आगाची भडका उडाल्याची घटना घडली आहे. यात एक महिला 90 टक्के भाजली होती. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही जर घरात सेनिटायझेशन करत असाल तर खबरदारी घ्या.

ही घटना नाशिकमधील वडाळागावातील महेबुबनगरमध्ये 20 जुलै रोजी रात्री घडली. रजबीया शेख असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वजण आपल्या पध्दतीने खबरदारी घेतोय. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सॅनियझरचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. पण, निकृष्ट दर्जाचे सॅनियझर वापरल्यामुळे विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे.

नाशिकमधील वडाळागावातील महेबुबनगर परिसरात लाईट गेली होती. रजबीया शेख यांनी घरात लाईट नसल्यामुळे मेणबत्ती लावली होती. रजबीया शेख यांनी रात्री 11 च्या सुमारास घरात सॅनिटायझरची फवारणी केली. त्यामुळे मेणबत्तीच्या ज्वालांशी संपर्क झाल्यामुळे घरात मोठा आगीचा भडका उडाला.

यावेळी रजबीया शेख यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तिने जोरात ओरडत घराबाहेर धाव घेतली. यावेळी त्यांचा पती शाहीद आणि आजूबाजूच्या महिलांनी धाव घेऊन आग विझवली. पण, तोपर्यंत रजबीया गंभीररित्या भाजली होती.

त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. चार दिवस या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, 24 जुलैला उपचारादरम्यान रजबीया यांचा मृत्यू झाला. रजबीया ह्या धुणी-भांडी करून दोन मुलींसह संसार करीत होत्या. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.