बेचाप बिल्डरांना दणका ! घर खरेदीनंतर एका वर्षात ताबा न मिळाल्यास ग्राहक ‘रिफन्ड’ मागू शकणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घर खरेदीनंतर त्याचा ताबा दिलेल्या मुदतीच्या एका वर्षानंतर देखील मिळाला नसेल तर ग्राहकाला रिफन्ड मागण्याचा अधिकार मिळणार आहे. राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगाने एका प्रकरणात हा निकाल दिला आहे. घर खरेदी केल्यानंतर घराचा ताबा मिळवण्यासाठी विलंब होत असेलेल्या ग्राहकांना या निकालामुळे दिलासा मिळणार आहे.

राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगाने दिलेल्या निकालानुसार, ग्राहकांना वेळेत घराचा ताबा न दिल्यास दहा टक्के व्याजासह ग्राहकाने दिलेली पूर्ण रक्कम परत द्यावी लागणार आहे. जर घराचा ताबा मिळवण्यासाठी उशीर होत असला तर बिल्डरला ग्राहकांना प्रति वर्षी सहा टक्के अशा दराने भरपाई द्यावी लागणार आहे. परंतु विलंब झाल्यास दावा कधी केला जाऊ शकतो हे य ग्राहक निवारण आयोगाने स्पष्ट केले नाही.

काय आहे प्रकरण –

दिल्लीच्या रहिवासी शालभ निगम यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. निगम यांनी २०१२ मध्ये ऑरिस इन्फ्रास्ट्रक्चर आणि ३ सी कंपनीने विकसित केलेल्या लक्झरी गृहनिर्माण प्रकल्पात एक फ्लॅट खरेदी केला होता.करारानुसार, घर वाटपाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत घराचा ताबा दिला जाणार होता. मात्र त्यांना घराचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.