सर्दी, ताप-खोकला, अपचन ‘या’ समस्यांवर फायदेशीर ठरतात ‘हे’ घरगुती काढे !

पोलिसनामा ऑनलाईन – ताप, सर्दी, खोकला हे कायम उद्भवणारे आजार आहेत. खास करून पावसाळ्यात या समस्या जास्त उद्भवतात. यासाठी काही घरगुती काढे ( homemade kadha ) तयार केले आणि त्यांचं सेवन जर केलं तर या समस्यांपासून आराम मिळतो. ऋतू कोणताही असो या काढ्यांमुळं इतरही अनेक विकारांवर फायदा मिळतो. प्रथमोपचार म्हणून हे घरगुती काढे ( homemade kadha ) उपयोगी ठरतात. आज आपण अशाच काही काढ्यांबद्दल माहिती घेणार आहोत. ते कसे बनवायचे आणि त्यांचे काय फायदे होतात हे सविस्तर जाणून घेणार आहोत.

1) ताप- काडे किराईत किंवा कडू किराईताच्या बारीक काड्या बाजारात मिळतात. एक ग्लास पाण्यात या काड्यांचे बारीक तुकडे एक चमचाभर टाकून पाव ग्लास शिल्लक राहीपर्यंत ते पाणी उकळा. यानंतर गरम असतानाच ते गाळून प्यायला द्यावं. यामुळं आराम मिळेल. आल्याचा एक तुकडा, तुळशीची 5-7 पानं, एक छोटा चमचा धने पावडर यांचाही गरम काढा प्यायला दिल्यास घाम येऊन ताप उतरतो. तापात अंग जास्त दुखत असेल तर याच काढ्यात दोन काळ्या मिरी कुटून टाकल्यास अंगदुखी कमी होते.

2) सर्दी – सर्दीसाठी पातीचहाचा (गवती चहाचा ) काढा केला जातो हे आपल्या सर्वांना माहितच आहे. पातीचहाच्या दोन पात्या (तुकडे करून) आल्याचा तुकडा, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप, तुळशीची पाच ते सात पानं (शक्यतो काळी तुळस), दोन काळ्या मिरी, एक लवंग, एक सपाट चमचा ज्येष्ठ मध हे सर्व दोन ग्लास पाण्यात उकळून अर्धा ग्लास शिल्लक ठेवून तो काढा गाळावा. त्यात थोडी खडीसाखर टाकून गरम गरम प्यायला द्यावा. दिवसातून दोन ते तीन वेळा काढा दिल्यास शिंका, सतत नाक वाहणं, नाक चोंदणं, डोकं जड होणं किंवा दुखणं, अंग मोडून बारीक ताप वाटणं या सर्व तक्रारींसाठी या काढ्याचा खूप फायदा होतो.

3) कफ – खोकला – एक ग्लास पाण्यात सपाट चमचा अळशी थोडी भाजून, कुटून टाका. यात एक सपाट चमचा ज्येष्ठ मध पावडर घालून पाव ग्लास पाणी शिल्लक राहीपर्यंत उकळून गाळून त्यात खडीसाखर घालून गरम असतानाच प्या. यानं खोकला कमी होतो. खोकल्यात छातीत कफ साठून सुटत नसेल तर याच काढ्यात चमचाभर किसलेला पांढरा कांदा आणि दोन मिरे ठेचून टाकावेत. दोन लवंगा, अर्धा चमचा ओवा आणि दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा ज्येष्ठ मध पावडर यांच्या काढ्यानंही कफ सुटतो. अळशी, ज्येष्ठमध आणि ओल्या हळदीचा तुकडा यांचा काढा सुक्या खोकल्यात गुणकारी आहे. खोकून खोकून दम लागत असेल तर लवंग, जायफळ, आल्याचा तुकडा, काळी मिरी, ओवा व ज्येष्ठमध यांचा काढा खडीसाखर घालून गरम, थोडा पण वारंवार प्यावा. लगेच फरक जाणवतो.

4) अपचन – पावसाळ्यात पचनक्रिया मंद होत असल्यानं पोटदुखी, मुरडा, आव पडणं, जुलाब होणं, भूक कमी होणं, उलट्या होणं असे अनेक प्रकारचे अपचनाचे विकार होतात. या सर्व विकारांमध्ये प्रामुख्यानं पचनक्रिया सुधारणं महत्त्वाचं आहे यासाठी सुंठ पावडर, आले, जिरे, ओवा, धने, बडीशेप, मिरी-पिंपळी पावडर अशा पाचक द्रव्यांचा अपचनाच्या विविध लक्षणांप्रमाणे काढा करून दिला जातो. नुसत्या सुंठीचा काढा (थोडा गूळ किंवा खडीसाखर टाकून) दिला तरी फरत पडतो.

हेही लक्षात असू द्या

1) सर्वसामान्यपणे काढ्यासाठी वापरली जाणारी द्रव्ये कुटून बारीक करून घ्यावीत. वस्तूच्या आठपट पाणी घालून ते उकळून एक चुतर्थांश (पावपट) शिल्लक राहिल्यावर गाळून घ्यावं.

2) काढा उकळत असताना त्यावर झाकण ठेवू नये.

3) काढा शक्यतो गरम किंवा कोमट असताना प्यावा.

4) काढा उकळवताना अग्नी मंद किंवा मध्यम स्वरूपाचा ठेवावा.

5) काढा केल्यावर तो लगेच संपवावा. शिल्लक काढा पुन्हा गरम करून पिऊ नये.

6) काढा शक्यतो सकाळ, संध्याकाळ रिकाम्या पोटी घ्यावा.

7) काढ्यात जर तु्म्हाला दूध टाकायचं असेल तर तो गाळून घेतल्यावर टाकावं.

8) मध टाकायचा असेल तर गाळलेला काढा कोमट झाल्यानंतर टाकावा. गरम काढ्यात टाकू नये.

9) गूळ किंवा खडीसाखर काढा गाळून झाल्यावर चवीपुरती घालून त्यात विरघळून द्यावी.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.