व्यापाऱ्याने ग्राहकाची विसरलेली बॅग परत करुन दिली प्रामाणिकपणाची प्रचिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आजकाल अनेक चोरीच्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात किंवा एखादी वस्तू जर आपण कुठे विसरलो तर ती पुन्हा त्याच जागी मिळेल अशी अपेक्षा ठेवणे देखील मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये एका दुकानदाराने एका ग्राहकाची बॅग परत करुन प्रामाणिकपणाची प्रचिती दिली आहे.

घडले असे की, श्री. राजगोपाळजी सोमाणी यांच्या के.के. मार्केट या दुकानात एक ग्राहक आपली बॅग विसरून गेले होते. दुकानामध्ये दिवसभरात अनेक ग्राहक येत असतात. त्यामुळे विसरलेली बॅग कोणाची असेल असा श्री राजगोपाळजी सोमाणी यांना प्रश्न पडला. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही चेक करुन पाहिले की, नेमके कोणत्या ग्राहकाच्या हातात ही बॅग होती. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्यांना लक्षात आले की त्या ग्राहकाने कार्ड स्वॅप करुन पेमेंट केले होते. त्यावरुन त्यांनी त्या ग्राहकाला फोन करुन बॅगेची कल्पना दिली. त्या बॅगमध्ये अंदाजे 2 लाख रुपये होते.

बॅग परत घेण्यासाठी आलेले ग्राहक हे खेड शिवापुरचे डॉक्टर होते. त्यांनी बॅग परत घेऊन कृतज्ञता व्यक्त करीत आनंदाने काही रक्कम श्री. राजगोपाळजी यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ती रक्कम नाकारली व आपला फक्त आशीर्वाद द्या, असे म्हणाले. यानंतर ते ग्राहक गेले आणि त्यांनी शॉल, श्रीफल आणून श्री. राजगोपाळजी यांचा सन्मान केला. माहेश्वरी समाज व सर्व व्यापारी बांधवांकरिता ही अभिमानाची गोष्ट आहे. श्री.राजगोपाळजी सोमाणी यांच्या प्रामाणिकपणाचे सर्व समाजाच्या वतीने कौतुक व अभिनदंन देखील करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा –