काय सांगता ! होय, बीडमध्ये हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश, अश्लील व्हिडीओ शूट करून खंडणीसाठी व्यापाऱ्याला डांबलं

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांनी हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. तर सात आरोपी फरार झाले आहेत. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या टोळीने एका विटभट्टी मालकाला डांबून ठेवत आणि अश्लील व्हिडीओ बनवून 15 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी येथील एका महिलेने नितीन रघुनाथ बारगजे (रा. टाकळी ता. केज) या तरुणाला फोन केला. तुमच्याकडून विटा खरेदी करायच्या आहेत, असे म्हणत नितीन बारगजे या तरुणाला मांजरसुंबा येथे बोलावून घेतले. या ठिकाणी त्यांच्यामध्ये विट खरेदी संदर्भात बोलणी झाली. यानंतर या महिलेने माझ्या सोबत कोणी नाही, मला पाटोद्यापर्यंत सोडा अशी विनवणी नितीन यांच्याकडे केली. त्यानुसार त्याने पाटोद्यापर्यंत सोडण्यास नेले. पाटोद्याला गेल्यानंतर महिलेने आष्टी येथे सोडण्याची विनंती केली. त्यानुसार निती याने महिलेला घरी सोडले.

घरी आल्यानंतर महिलेने चहाचा आग्रह करून नितीन यांना घरात बोलावून घेतले. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने बारगजे याला एका रूममध्ये कोंडले आणि महिलेने जबरदस्तीने लगट केले. त्याचा व्हिडीओ महिलेच्या साथीदारांनी काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच 15 लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. त्यानुसार 10 लाख रुपये देतो, त्यासाठी माझी शेती विकतो, अशी विनवणी नितीन याने केल्यानंतर त्या महिलेने पैशासाठी नितीन सोबत एकाला दुचाकीवर केज येथे पाठवले.

केज येथे आल्यानंतर नितीन यांनी आपल्या मित्र परिवाराकडे दहा लाख रुपये हात उसणे मागितले. अचानक 10 लाख रुपये कशाल हवेत, असा प्रश्न मित्रांना पडल्यानंतर यात काही तरी काळंबेरं असल्याचा संशय मित्रांना आला. नितीन आणि त्याच्या मित्रांनी प्लॅनिंग करुन नितीनसोबत आलेल्या व्यक्तीला विशासात घेतलं. तुमचे अन्य लोक पैशासाठी बोलवा, व्हिडीओ क्लिप डिलिट करुन कायमचा प्रश्न मिटवा, तुमचे पैसे देऊन टाकू असे सांगितल्यावर संबंधिताने आपल्या साथीदारांना केजमध्ये बोलावून घेतले. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

तिघेजण स्कॉर्पिओमधून केज येथे आले. त्यानुसार नितीन बारगजे यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या शेखर वेदपाठक याला पोलिसांनी अटक केली. तर इतर आरोपी फरार झाले. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात नितीन बारगजे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा शिंदे, सविता वैद्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे.