हनी ट्रॅप गॅंग च्या निशाण्यावर होते 13 वरिष्ठ IAS अधिकारी, ‘सेक्स व्हिडिओ’ बनवून ‘ब्लॅकमेलिंग’ची केली होती तयारी

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेश हनी ट्रॅप प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. या टोळीतील सदस्यांकडून तपास यंत्रणांना वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची ‘लक्ष्य यादी (Target List)’ मिळाली आहे, ज्यांना सुंदर मुलींनी त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते आणि आता त्यांचा सेक्स व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंगची तयारी सुरू केली होती. हनी ट्रॅप टोळीच्या यादीमध्ये अशा आयएएस अधिकाऱ्यांची नावे कोड वर्डमध्ये आहेत.

या प्रकरणात आतापर्यंत ४ हजाराहून अधिक फाईल्स तपास यंत्रणांनी तयार केल्या असून हा देशातील सर्वात मोठा ब्लॅकमेलिंग घोटाळा असल्याचे म्हटले जात आहे आणि यासंबंधी तपासाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या टोळीचे बळी हे चार राज्यांचे उच्च नेते, आयएएस अधिकारी, अभियंता, मोठे व्यापारी आहेत. हे सेक्स व्हिडीओ आणि अश्लील चॅटिंग, इत्यादी ब्लॅकमेलिंग चे पुरावे टोळीतील सदस्यांच्या लॅपटॉप व मोबाईलमधून जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीला मच्छीमारी, शेती, संस्कृती, उद्योग, नागरी प्रशासन, कामगार, वने जलसंपदा, जनसंपर्क अशा वेगवेगळ्या प्रशासनिक विभागांमध्ये काम केलेल्या १३ आयएएस अधिकाऱ्यांची नावे आढळून आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

टोळीच्या सूत्रधाराने ‘हिट लिस्ट’ तयार केली होती :
या सेक्स ब्लॅकमेलिंग टोळीच्या सूत्रधाराने सरकारी डायरीच्या पानांवर ‘हिट लिस्ट’ बनविली. तपासणीशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की यादीमध्ये समाविष्ट केलेल्या अधिकाऱ्यांना लक्ष्य ठेवण्यात आले होते आणि त्यांची नावे कोड मध्ये लिहिलेली आहेत . काही अधिकाऱ्यांच्या नावांना गोल केले गेले आहे आणि काही अधिका्यांच्या नावांसमोर ‘महत्वपूर्ण’ किंवा ‘ओके’ लिहिलेले आहे. कोड वर्ड लँग्वेजमध्ये काय लिहिले आहे याचा अर्थ तपासकर्ता शोधत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीच्या सुंदरीच्या मोबाइल फोनवरून काही व्हिडिओ क्लिप सापडल्या आहेत. यासंदर्भात विचारले असता एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मोहपाशमध्ये अडकलेल्या अधिका्यांची व्हिडिओ क्लिप पाहून त्यांची ओळख पटविली जात आहे आणि त्यांची पदे किंवा ज्येष्ठता विचारात न घेता त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल”.