Hong Kong मध्ये ‘कोरोना’चा रुग्ण 142 दिवसांनी पुन्हा आढळला पॉझिटिव्ह, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना विषाणू विरोधात युद्ध जगभरात सुरु आहे. औषधे आणि लसींच्या चाचण्या बर्‍याच ठिकाणी अंतिम टप्प्यात आहेत. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जगभरात कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत हाँगकाँगच्या एका रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. हाँगकाँगमध्ये 142 दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेली एक व्यक्ती पुन्हा कोरोना संक्रमित झाल्याचे आढळले आहे, ज्याच्या तपासणीत काही नवीन तथ्य समोर आले आहेत.

कोणाचा आहे हा रिपोर्ट

या आठवड्याच्या सुरुवातीस, हाँगकाँग विद्यापीठाने एक अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये कोरोना विषाणूमुळे पुन्हा एकदा संसर्ग झालेल्या जगातील पहिल्या घटनेचे वर्णन केले गेले. मार्चमध्ये 33 वर्षीय हा व्यक्ती प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. 142 दिवसांनंतर त्याला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. मार्चमध्ये बरे झाल्यानंतर रुग्णाने प्रथम ब्रिटनमार्गे स्पेनला प्रवास केला आणि त्यानंतर हॉंगकॉंगला परत आल्यावर त्याची पुन्हा तपासणी केली असता संसर्ग झाल्याचे दिसून आले. या व्यक्तीला दुसर्‍या वेळी संसर्ग झाल्याची पुष्टी करण्यासाठी संशोधकांनी जीनोम सिक्वेंसींग अभ्यास केला. यासह, संशोधक हे देखील निश्चित करत आहेत की हे केवळ व्हायरस शेडिंग आहे की पुनःसंक्रमणच आहे.

कधी झाला संसर्ग

हा 33 वर्षीय पुरुष हाँगकाँगमधील एक निरोगी व्यक्ती आहे आणि यावर्षी 26 मार्च रोजी तो आरटी-पीसीआर चाचणीद्वारे कोविड -19 ने संक्रमित आढळला होता. पहिल्याच दिवशी खोकला, घसा खवखव करणे, ताप यासारख्या लक्षणांमुळे त्यास 29 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर दोन वेळा निगेटिव्ह चाचणी आणि लक्षणे सुधारल्यानंतर त्या व्यक्तीला 14 एप्रिल रोजी रुग्णालयातून सोडण्यात आले होते.

मग ही व्यक्ती यूके आणि स्पेनला गेली

हॉस्पिटल सोडल्यानंतर त्या व्यक्तीने ब्रिटनहून स्पेनला प्रवास केला आणि 15 ऑगस्टला हाँगकाँगला परतला. विमानतळावर तपासणी केल्यावर हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. या दरम्यान हा माणूस संपूर्ण एसिम्प्टोमॅटिक राहिला आणि त्याला कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. एवढेच नाही, तर या व्यक्तीचे ब्लड प्रेशर, तापमान, पल्स, रक्तातील ऑक्सिजनची पातळी, चेस्ट रेडियोग्राफ हे सर्व सामान्य असल्याचे आढळून आले आणि त्याला रुग्णालयातही अँटी व्हायरल उपचार दिले गेले नाहीत.

पहिल्या आणि दुसर्‍या प्रकरणांमध्ये काय फरक आहे

जेथे पहिल्या संसर्गाच्या वेळी त्याच्या शरीरात अँटीबॉडीज सापडल्या नाहीत, तेथे दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यावर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर 5 दिवसानंतर अँटीबॉडीज सापडल्या.

स्ट्रेनमध्ये काही फरक होता का?

पुन्हा संसर्ग होण्याला सुनिश्चित करण्यासाठी संशोधकांनी रुग्णाच्या ओरल स्वॅबच्या नमुन्यांची संपूर्ण जीनोम सीक्वेंसिंग केली. तपासणी करून संशोधकांनी हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला की जुन्या स्ट्रेनमध्ये काही फरक आहे का आणि जर आहे तर किती आहे. दुसर्‍या प्रकरणातील हाँगकाँग, यूके आणि स्पेन आणि पहिल्या प्रकरणातील हाँगकाँगच्या नमुन्यांचे तुलनात्मक विश्लेषण केले गेले.

किती होता फरक

या अभ्यासामध्ये असे आढळले आहे की जुन्या प्रकरणांमध्ये आणि नवीन प्रकरणांमध्ये व्हायरसच्या स्ट्रेनमध्ये खूप फरक आहे. त्यांना आढळले की व्हायरस स्ट्रेन दुसर्‍या बाबतीत म्हणजेच नंतरच्या बाबतीत अगदी वेगळा आहे. पहिला स्ट्रेन मार्च-एप्रिल 2020 मध्ये अमेरिका, इंग्लंडमध्ये पसरला होता तर दुसरा स्ट्रेन स्वित्झर्लंड आणि इंग्लंडमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये पसरला होता.

या अभ्यासानुसार हे दिसून आले की सामूहिक प्रतिकारशक्ती पूर्णपणे कोरोना संसर्ग रोखू शकत नाही. यावरून हे देखील स्पष्ट झाले आहे की जगात काही काळासाठी कोरोना संसर्ग अजून वेगाने वाढणार आहे. या अभ्यासामध्ये यावर देखील जोर देण्यात आला आहे की लसीच्या अभ्यासामध्ये बरे झालेल्या रूग्णांकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे.