‘सीरम’च्या पूनावालांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’नं सन्मानित करा, मनसेची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारतामध्ये लस विकसित करण्यात येत आहे. या लसीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून अशातच पुण्यातील सायरस पुनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूट ही संस्थादेखील कोरोनावरील लस विकसित करण्याचे काम करत आहे. याशिवाय सीरमने अनेक रोगांवरील लसीही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे अनेक वर्षाचे योगदान पाहता सायरस पुनावला यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी मनसेनं केली आहे.

मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. सायरस पुनावाला हे सीरम इन्स्टिट्युटच्या माध्यमातून गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करुन देत आहे. या महासाथीतही पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करुन मोठा दिलासा दिला आहे. पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे आहे, असे नांदगावकर यांनी म्हटले आहे. असे भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात यावं अशी विनंतीही त्यांनी केले आहे.

सारयस पुनावाला यांनी 1966 मध्ये सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली आहे. आजपर्यंत अनेक आजारांवरील लस विकसित करण्यात सीरमचा मोठा वाटा आहे. सीरममध्ये सध्या पोलिओ, डायरिया, हेपिटायटिस, स्वाईन फ्लू सारख्या लसीही विकसित करण्यात येत आहेत. तसेच सध्या कोरोनावरील लसही विकसित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. तसेच ही लस माफक दरात सरकारला देण्यात येणार असल्याचे अदर पुनावला यांनी यापूर्वीच सांगितले आहे.