पत्रकारांसाठी लागू होणार सन्मान योजना ; दरमहा सरकार देणार ‘एवढे’ मानधन  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जेष्ठ पत्रकरांचा सन्मान करण्यासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बाबतचे आदेश राज्य शासनाने काल शनिवारी जारी केले आहे. वयाची ६० वर्ष पूर्ण केलेल्या आणि ३० वर्ष सक्रिय पत्रकारिता अथवा  छायाचित्रकारण करणाऱ्या पत्रकारांसाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेस पात्र असणाऱ्या पत्रकारांना दरमहा १० हजार रुपये राज्य सरकार मानधनाच्या स्वरूपात देणार आहे.

नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागणीतच पत्रकार सन्मान योजनेसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सदरची योजना शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीमार्फत राबवण्यात येणार आहे. संबंधित निधीला स्थापन करण्यात आलेल्या वित्त विभागाने मान्यताही दिली आहे. राज्यातील विविध पत्रकार संघटनांनी या योजनेच्या मागणीसाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला सकारात्मक दुजोरा दिल्याने हि योजना अस्तित्वात येऊ घातली आहे.

पत्रकार सन्मान योजना हि अधिस्विकृतीधारक तसेच अधिस्विकृतीधारक नसलेल्या पत्रकारांसाठी लागू असणार आहे. ज्या लोकांची उपजीविका केवळ पत्रकारिता होती. अशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे पत्रकारितेतून निवृत्ती घेतल्या नंतर ज्यांच्या कडे इतर उत्पन्नाचा स्त्रोत आहे आणि जे आयकर भरतात अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याच प्रमाणे गंभीर गुन्ह्यात ज्यांच्यावर दोषसिद्ध झाले आहेत आणि शिक्षा हि झाली आहे अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. फडणवीस सरकारच्या या योजनेचे सर्वच पत्रकारांनी स्वागत केले आहे.